Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण आणि कृषी या विभागाने समन्वयातून काम करावे. या विभागांनी प्रत्येक शेतकऱ्यांना लखपती करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना मृद व जलसंधारण, रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी आज येथे केली.

नियोजन भवन येथे रोहयो, जलसंधारण विभागाचा आढावा आणि ‘हर खेत को पाणी ‘ याबाबत आयोजित आढावा बैठकीत श्री. नंदकुमार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अधीक्षक अभियंता तथा प्रादेशिक जलसंधारण अधिकारी दिलीप प्रक्षाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. नंदकुमार यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात मका, सोयाबीन, तूर, मूग, ऊस आणि फळबागा ही पिके घेतली जात आहेत. यामुळे प्रत्येक विभागाने जास्त उत्पादन मिळणाऱ्या पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा विचार करावा . कोरडवाहू नाव हद्दपार करून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून तीन पिके घेता यावी म्हणून प्रत्येकाच्या शेतीला पाणी देण्याचे सूक्ष्म नियोजन करा. जिथे पाऊस पडतो, तिथलं पाणी अडवण्याचा प्रयत्न करा, याबाबत शेतकऱ्यांना समजावून सांगा . १०० टक्के पाणी मुरण्याची व्यवस्था करून त्यातील ६० टक्के पाण्याचा वापर होईल, असेही नियोजन करा ,असेही ते म्हणाले .

पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनाद्वारे दिले तर एकरी ४० टक्के उत्पादन वाढत असल्याचे शेतकऱ्यांना पटवून द्या. यामुळे शेतकरी लखपती होण्यास मदत होणार आहे, असेही श्री. नंदकुमार यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे व्हावीत. कामे मागायला आल्यास त्वरित देता येण्यासाठी आणि मंजुरीची धावपळ टाळण्यासाठी प्रत्येक गावात पाच कामे सेल्फवर ठेवायला हवीत. पाणलोट विकास मानवाला धरून करायचा आहे. पाऊस आहे, पाणी आहे यामुळे प्रत्येक शेताला वर्षातून तीनदा पाणी देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रोहयोचे राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे यांनी रोहयोतून लखपती होण्याचा मार्ग सांगितला. ग्रामपंचायतीने रोहयोतून मत्ता निर्माण करून शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

रोहयोच्या राज्य प्रकल्प अधिकारी सायली घाणे यांनी समृद्धी बजेटच्या आधारे प्रत्येक शेताला पाणी देणे शक्य आहे. शेततळ्यामधून दोन, तीन पिके घेता येतात, हे शेतकऱ्यांना पटवून द्या. पिकांना गरजेपुरते पाणी दिल्यास उत्पादन मिळते,असे त्यांनी सांगितले .

श्री. प्रक्षाळे म्हणाले, प्रत्येक विभागाने पाण्याचा काटेकोरपणे वापर होईल, असे नियोजन करावे. जिल्ह्यातील ११ तालुक्यात ११ गावे दत्तक घेऊन जास्तीत जास्त जलसंधारण होण्यासाठी प्रयत्न करा.

श्री. स्वामी यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात पाणी अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वॉटर बँक करण्याचा प्रयत्न करून करू.

श्री. शंभरकर म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रोहयोची कामे करावीत, त्यांना त्याचे पैसे रोहयोतून मिळतील, हे प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून द्यावे. ११ गावे निश्चित करून जलसंधारणची कामातून आदर्श गावे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी श्री. गुरव यांनी रोहयो, कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी कृषी आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

जिल्ह्यात सध्या रोहयोमधून ७६२ कामांवर ३६२५ मजूर काम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *