अलर्ट | जिल्हाधिकार्‍यांनी घेतली टास्क फोर्सची बैठक ; निर्बंध होणार कडक

0
127

Big9news Network

  • जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने दक्ष रहावे- जिल्हाधिकारी
  • जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 3 जानेवारी 2022 पासून लसीकरण सुरू

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. या कामाबाबत कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही , असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्ह्याच्या टास्क फोर्सची आढावा बैठक आज नियोजन भवन येथे श्री शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार,पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. आर.डी. जयकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव, इंडीयन मेडीकल असोशिएशन अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, कोविड नोडल अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. बसवराज लोहारे, डॉ. अतिश बोराडे, डॉ. अरूण काटकर, सहायक कामगार आयुक्त अशोक कांबळे, सहायक आयुक्त समाज कल्याण राहूल काटकर, सहायक आयुक्त अन्न व औषध ध.अ.जाधव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडील सर्व साधन सामग्रीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सर्व विभागांनी दक्ष रहावे. जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन प्लांट व ऑक्सिजन प्रोसेस प्लांट सुरू असणे आवश्यक आहे. ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी सर्व टँकमध्ये ऑक्सिजन भरून ठेवणे गरजेचे आहे. सर्व सीसीसी, आयसोलेशन सेंटर पूर्ववत चालू करावे लागले तर त्या अनुषंगाने सर्व तयारी करणे आवश्यक आहे. ऑक्सिजन बेड व इतर काही आरोग्यविषयक साधनसामग्री तपासून घ्याव्यात. कोरोना टेस्टींग किट मुबलक प्रमाणात उपलब्ध असले पाहिजेत. जास्तीत जास्त टेस्ट होणे आवश्यक आहे. सर्व आरोग्य यंत्रणांनी कोणताही हलगर्जीपणा न करता सर्व नियोजन व्यवस्थित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लसीकरणासाठी असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सकाळी लवकर ग्रामीण भागामध्ये लसीकरणासाठी जावे. तसेच 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोविड लस देण्यात येणार आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची संख्या जिल्ह्यामध्ये 2.30 लाख एवढी आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांचेशी संपर्क साधून जास्तीत जास्त मुलांचे लसीकरण कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच लसीचा पहिला आणि दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण सुध्दा जास्त आहे. संबंधितांनी लसीकरणाबाबत जनजागृती करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.