हृदयद्रावक घटना ! वीज कोसळल्याने १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करुण अंत

0
16951

Big 9 News Network

तुळजापूर तालुक्यातील काटगाव नजीकच्या घटेवाडी शिवारात हृदयद्रावक दुर्घटना घडली. बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यात वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत शेळ्या राखण्यास गेलेल्या १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करुण अंत झाला. धर्मेंद्र मसाप्पा कोळी असं त्या अभागी बालकाचं नाव असल्याचे सांगण्यात आले.

या आठवड्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि वादळ-वाऱ्याचा तडाखा बसत आहे. बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात काटगांव-घटेवाडी शिवारात पावसापासून स्वतःचा आणि शेळ्यांचा बचाव व्हावा, म्हणून धर्मेंद्र कोळी हा १२ वर्षीय मुलगा त्याच्या शेळ्यांसह झाडाच्या आडोशाला बसला होता.

वादळी वारं अन् वीजांच्या कडकडाटात त्या झाडावर वीज कोसळून धर्मेंद्र आणि त्याच्या २६ शेळ्यांचा करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

या दुर्घटनेची खबर मिळताच नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत इटकळ पोलिस चौकीचे पोलिस हवालदार विलास जाधव, पोलिस कॉन्स्टेबल अतुल साळुंके, मंडल अधिकारी शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. वीज कोसळून शेळ्या राखण्यास गेलेल्या धर्मेंद्रचा करूण अंत झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.