राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ‘शरद पवार’ आज सोलापुरात

0
129

Big9news Network

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार हे आज, शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून, शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादीचे असे दोन वेगवेगळ्या मेळाव्याला ते हजेरी लावणार आहेत.

आज सकाळी ९ वाजता बारामतीहून सोलापूरकडे ते हेलिकॉप्टरने निघणार आहेत. ९.३० वा. त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी १० वा. विश्रामधाम येथे आगमन त्यानंतर वा. हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थिती. १.४५ वा. महेश कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी भेट. दुपारी २ वा. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थिती. ४ वा. शासकीय विश्रामधाम येथे चेंबर ऑफ कॉमर्स, सूतगिरणी, एमआयडीसी, अल्पसंख्याक, लिंगायत कमिटीच्या नेत्यांबरोबर बैठक. सायंकाळी ६ वा. कारने बारामतीकडे रवाना.

 

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार यांचा हा दौरा होत आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्याच्या दृष्टिकोनातून इतर पक्षांतील नगरसेवकांना प्रवेश देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी ठरलेला दौरा रद्द झाला होता.

अण्णांच्या घरी पाहुणचार –

शहराच्या राजकारणातील विशेष म्हणजे महापालिकेतील दबंग राजकीय नेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचा निश्चित केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर आगामी महापालिका निवडणुकीची सर्व जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्याच अनुषंगाने नव्या-जुन्या नेत्यांची सांगड घालून जुळवाजुळव करण्याचे काम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरात करणार आहेत, अशी चर्चा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा सुरू आहे. महेश कोठे यांच्या निवासस्थानी शरद पवार पाहुणचार घेणार असल्याने आगामी काळात शहर राजकारणाची सूत्रे राधाश्री वरून हलणार असे चिन्ह दिसत आहेत.