Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

कोरोना मुक्त झालेल्या गावात कोविड चे नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या असून राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.सोलापुरातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना उपक्रमशील अधिकारी म्हणून ओळखले जात आहे.त्यांच्या कोरोनामुक्त गाव,माझे गाव माझी जबाबदारी, गाव तेथे covid सेंटर अशा कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या आधीच घेतली आहे. राज्यात येत्या १५ तारखेपासून पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला आहे. त्याआधीच जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत त्या गावातील शाळांची सुरुवात आज करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत त्या गावातील शाळांची घंटा आज वाजली. गेली दिड वर्ष कपाटाच्या कोपऱ्यात पडलेला शाळेचा गणवेश धुवून इस्त्री करून मुलांनी आज परिधान केला आणि उत्साहात मुले शाळेत आली. गेली कित्येक महिने शांत असलेल्या शाळेच्या घंटेने आज नाद धरला.

बोरामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व एस व्ही सी एस माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सीईओ स्वामी यांनी मुलांचे स्वागत झाल्यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन सुरक्षित अंतर ठेवून मुलांची बैठक व्यवस्था आहे किंवा कसे याची पाहणी केली. मुलांना व शिक्षकांना त्रिसूत्रीचे पालन करण्यासंबंधी सुचना दिल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरामणी येथील झाडा खाली भरलेल्या शाळेची पाहणी करून शिक्षकांचे अभिनंदन केले.


यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, गटविकास अधिकारी राहूल देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, केंद्रप्रमुख श्रीशैल स्वामी, स्वाती कल्याणी, तबस्सुम शेख, अलका कदम, जमेला तांबोळी एस.व्ही.सी.एस महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले, पर्यवेक्षक स्वामी, फुलारी इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *