Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big 9 News Network

अक्कलकोट-सोलापूर ते दुबई कनेक्शन येणार उघडकीस..!

सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजवण्याऱ्या सी सी एच क्रिप्टो (CCH cloud mining app ) घोटाळ्यानंतर मॅक्स क्रिप्टो (Max crypto )मोठ्या चर्चेचा विषय ठरला. पोलिसांनी या दोन्ही संचालकांवर कारवाई केल्यानंतर आर वाय (RY crypto)
लगेच लाँच झाले. परंतु सायबर क्राईम आणि पोलिसांच्या भीतीने आठ ते दहा दिवसात ते लगेच बंद पडले. वरील सर्व प्रकरणामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात आणि तालुक्यात क्रिप्टो करेंसी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. यात गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले..पण हे कमी का काय..? म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दुरुपयोग एका कंपनीने केलाय. अक्कलकोट मधून एका क्रिप्टो करेन्सीचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला झाला. त्याचे ‘कॉइन’ राजरोसपणे विक्री होत आहे. इतर क्रिप्टो करेन्सी स्कॅम पेक्षा हा राज्यातील सर्वात मोठा हजारो कोटींचा क्रिप्टो करन्सी स्कॅम असल्याचं बोललं जातंय.

नेमकं प्रकरण आहे तरी काय..?

सोलापूरच्या बॉर्डरवर असलेले गुलबर्गा, विजयपूरमार्गे अक्कलकोट मध्ये ‘क्रिप्टो करेंसी कॉईन्सचा एक App लॉन्च करण्यात आला. त्यात अक्कलकोट तालुक्यातील आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील अनेक शेतकरी,व्यापारी, महिला, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांनी मोठ्या प्रमाणावर रकमा गुंतवल्या आहेत.

असा आहे प्लॅन..

मोठ्या आलिशान गाडी मधून येणाऱ्या एजंट मंडळीने आपल्या गोड बोलण्याने क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक परतावा परत मिळेल असे प्रलोभन दाखवले. या आभासी चलनाचे स्वतःचे ॲप असून एक्सचेंजर ,ब्लॉक चेन आहे आणि विशेष म्हणजे याचा संचालक स्वतः डॉक्टर आणि वकील अशी दोन्ही डिग्री घेतलेला बडा असामी आहे असे सांगण्यात येत आहे.

संचालक मंडळीसोबतचे परदेशात केलेल्या ट्रीप चे फोटो, त्यांच्या आलिशान गाड्या, पुण्यातील एका अतिशय महागड्या इमारतीमध्ये असलेले ऑफिस, संचालकांच्या आलिशान गाड्या आणि भविष्यात करोडो रुपयांमध्ये मिळणारा परतावा असे आमिष दाखवून स्वतःच्या हाताने मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करावयास लावून आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत.

सी सी एच अँप, मॅक्स क्रिप्टो आणि आर वाय प्रमाणे रोजच्या- रोज डॉलर मध्ये मोबाईल ॲप द्वारा पैसे मिळत नाहीत, उलट क्रिप्टो कॉइन घेतलेले ‘स्टेक‘ केल्यास क्रिप्टो कॉइन संख्या लगेच डबल होते. भविष्यात एका कॉइनचा रेट एक लाख रुपये होईल, असे प्रलोभने दाखवून एजंट मंडळींनी ग्रामीण भागातील अनेक व्यक्तींच्या मोठ्या प्रमाणावर रकमा गुंतवायास लावल्या.

जे दिसत नाही त्याचीच करोडो रुपयांची विक्री…
जे क्रिप्टो कॉइन डोळ्याला दिसत नाही, जी रक्कम बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होत नाही. त्या कॉइनचीच करोडो रुपयांची विक्री या एजंट मंडळींनी सोलापूर शहर जिल्ह्यात केली.

ज्यांनी रकमा गुंतवल्या त्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. त्यामध्ये गुंतवणूकदारांना कॉईनचा रेट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, असे आभासी आणि खोटे चित्र अॅप द्वारे निर्माण करण्यात आले. काही रुपयांचा कॉइन हजारो रुपयात गेल्याचे ॲपच्या माध्यमातून एजंट,आणि पुण्यातील एका बड्या ऑफिस मधून दाखवण्यात आले .त्यामुळे अनेकांनी पुन्हा- पुन्हा त्यामध्ये पैसे गुंतवले .विशेष म्हणजे कोणालाही परत एक रुपया सुद्धा मिळाला नाही. जेव्हा आर्थिक परताव्याची मागणी केली असता टाळाटाळ करण्याचे प्रकार घडत आहे त्यामुळेच हा मोठा घोटाळा उघडकीस येतोय.

दागिने, प्लॉट,शेतजमीनही लावली विकायला..!

अनेकांनी या कॉइन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी दागिन्यांची विक्री केली असल्याचे समजते तर काहींनी स्वतःचे प्लॉट आणि शेतजमीन विकली आहे असे खात्रीशीरित्या समजते. गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळत नसल्याने अनेक जण पोलिसात आणि सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याचे चर्चा सुरू आहे.

अँप, ब्लॉकचेन, एक्सचेंजरचा गुंतवणूकदारांना फटका

पुण्यातील आलिशान ऑफिसमध्ये ही एजंट मंडळी गुंतवणूकदारांना घेऊन जायची ,त्या ठिकाणी असलेले इंडिया हेड , बिल्डर डेव्हलपरमध्ये नाव कमवलेला एक ‘साहेब’,आणि स्वतःला कधी डॉक्टर कधी वकील सांगणाऱ्याची भेट घालून दिली जात असे. अशी माहिती समोर आली आहे. तिथे कॉईनचे प्रत्यक्ष दिले जायचे आणि यामध्ये गुंतवणूक करावयास भाग पाडले जात असे. अनेकांनी आपल्या रकमा फोन पे गुगल पे आणि काही रोख स्वरूपात दिल्याची माहिती समोर येत आहे.

धक्कादायक | महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘ट्रेनिंग’..
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आर्थिक प्रलोभने दाखवून त्यांना या क्रिप्टो कॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात आहे. झूम मीटिंग द्वारे ब्रेन वॉश करण्याचे
जोमात काम सुरू आहे. नव्या मुंबईतील एका महाविद्यालयात यासाठी मोठ्या प्रमाणावर स्पॉन्सर्स देणगी देऊन
महाविद्यालय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मीटिंग घेऊन क्रिप्टो करन्सीचे धडे देत असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.  याच गोष्टीची चर्चा इतर महाविद्यालयात झाली.

क्रिप्टो करन्सीवर काम करणाऱ्या कंपनी व एजंट लोकांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश कसा काय देण्यात आला.? या आर्थिक फसवणुकीमध्ये महाविद्यालयातील प्राचार्य ,प्राध्यापक मंडळी आणि संचालक मंडळी सुद्धा गुंतलेली आहे काय.? असा संशय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर महाविद्यालयांमध्ये उपस्थित केला जातोय.

हजारो कोटींचा असू शकतो घोटाळा..!

एक बिल्डर- डेव्हलपर आणि एक डॉक्टर, वकील अशा पदव्या घेतलेला मास्टर माईंड त्याच्या सोबत असणारी एजंट मंडळी यांनी मोठ्या प्रमाणावर राज्यात आणि देश पातळीवर अत्याधुनिक यंत्रणा उभी केली आहे. त्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ज्या एजंटांनी आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करावयास भाग पाडणारे एजंट मंडळी, ॲप निर्माण करणारा आणि चालवणारा मास्टर माईंड, त्याचा बिल्डर साथीदार ,प्रात्यक्षिक देऊन ब्रेन वॉश करणारा इंडिया हेड, त्याचे सहकारी, आणि या आर्थिक घोटाळ्यात गुंतलेले कार्यालयीन कर्मचारी, व्हाट्सअप ग्रुप चालणारे ऍडमिन आणि झूम मीटिंग द्वारे आर्थिक गुंतवणूक करण्याचे प्रशिक्षण देणारा या सर्वांची कायदेशीर चौकशी सायबर क्राईम च्या माध्यमातून करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांमधून होत आहे.

(भाग 2) आर्थिक फसवणूकीस बळी पडलेले गुंतवणूकदार काय करणार..? 

क्रमशः..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *