Breaking | आजपासून बेशिस्त वाहनांवर कारवाई ! जागेवर दंड न भरल्यास वाहन जप्त

0
3290

Big9news Network

शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर आता आजपासून (सोमवारी) विशेष मोहिमेतून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक आर्वे यांनी त्यासंबंधीचे स्वतंत्र आदेश रविवारी काढले. परिवहन आयुक्‍तालयाने बेशिस्त वाहनांवरील दंडात्मक रकमेत मोठी वाढ केली आहे.

सोलापूरचे पोलीस आयुक्‍त हरीश बैजल यांनी हटके गांधीगिरी फंडा शोधून काढला. आधी प्रबोधन ,समुपदेशन आणि आता दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.

शहरातील अपघात व बेशिस्त वाहनधारकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने  लहान मुलांच्या माध्यमातून वाहनचालक यांना प्रबोधन, रस्त्यावर प्रतिकात्मक यमदूत उभा करून जनजागृती करण्यात आली होती.

दरम्यान. आमदार प्रणिती शिंदे, सामाजिक संघटना, यांनी पालकमंत्र्यांना कारवाई थांबवण्यासाठी निवेदन दिले होते.यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कारवाई थांबणार नसल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

रिक्षाचालकांकडे गणवेश, भाडे आकारणी साठी मीटर नसणे, बेशिस्त पद्धतीने रिक्षा चालवणे, ग्राहकांशी अरेरावी असे अनेक प्रकारांना आळा घालण्यासाठी आज पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

ट्रिपल सीट दुचाकीस्वार, one way तून गाडी चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व माल वाहतूक, अशा अनेक गोष्टींना आळा बसणार आहे.

धक्कादायक बाब म्हणजे रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या पाचमध्ये आहे.

शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी

आज सोमवारी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. हेल्मेट, ट्रिपलसीट, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, मोबाइल टॉकिंग, विमा नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नाही, अशा नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाणार असून रोखीने अथवा ऑनलाइन पध्दतीने जागेवर दंड न भरणाऱ्यांची वाहने जमा केली जाणार आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांना चांगलाच चाप बसणार आहे.