बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा ;अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी जोमाने तयारी करण्याचे आवाहन -पालकमंत्री

0
157

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा
अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी जोमाने तयारी करण्याचे आवाहन

सोलापूर,दि.8: उच्च माध्यमिक (बारावीच्या) परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जीवनात यश-अपयश येत असते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. बारावीच्या परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा तयारी करावी. यश हे नक्की मिळणार आहे, यामुळे चिंता न करता अभ्यास करण्याचे आवाहन श्री. भरणे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आज दुपारी जाहीर झाला आहे. बारावी परीक्षेचा सोलापूर जिल्ह्याचा निकाल 94.15 टक्के इतका लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातून विज्ञान, कॉमर्स, कला, व्यावसायिक आणि टेक्निकल सायन्सच्या 54 हजार 479 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 51 हजार 293 विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये 31 हजार 745 मुलांपैकी 29 हजार 443 मुले उत्तीर्ण तर 22 हजार 734 मुलींपैकी 21850 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

विज्ञान शाखेचा निकाल 98.83 टक्के, कॉमर्स शाखा 92.55 टक्के, कला शाखा 90.57 टक्के, व्यावसायिक 88.43 टक्के तर टेक्निकल सायन्सचा 83.33 टक्के निकाल लागला असल्याची माहिती माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी दिली.