Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

अनेक जणींना आजकाल तिशीच्या आतच थायरॉईडची समस्या निर्माण होताना दिसते. पाळी येण्यातली अनियमितता हे थायरॉईडचं प्रमुख लक्षण.

पाळीमधल्या अनियमिततेमुळे अनेक मुलींच्या मनात थायरॉईडचा धसकाच बसतो, कारण मग पुढे प्रेगनन्सीचा विचार करताना कसं होणार हा प्रश्न त्यांना भेडसवायला लागतो.

थायरॉईडची समस्या असताना प्रेगनन्सी प्लॅन करताना…

     तरुण मुलींना प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर, त्यांच्यासाठी थायरॉईड हॉर्मोनचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसं नसेल तर प्रेग्नन्सी राहण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

     प्रेग्नन्सी राहिली तरी गर्भपाताचा धोका वाढतो तसेच गरोदरपणात गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते.

     गर्भार स्त्रीमध्ये थायरॉईड हॉर्मोन्सची कमतरता असल्यास गर्भाच्या बौद्धिक क्षमतेवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असे आढळून आले आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीमध्ये फक्त बाळाच्या योग्य वाढीसाठी थायरॉईडच्या गोळीचा छोटा डोस सुरू केला जातो आणि डिलिव्हरी नंतर तो बंद केला जातो.

      स्त्रियांमध्ये चाळिशीनंतर या समस्येचे प्रमाण जास्त आहे, पण वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे कमी वयातही ही समस्या बऱ्याच वेळा दिसून येत आहे. यामध्ये आनुवंशिकता हा महत्वाचा घटक आहे. आई, मुलगी, मावशी, मावसबहीणी यांमध्ये थायरॉईडची समस्या असू शकते.

     त्यामुळे आईला ही समस्या असेल तर मुलीची तपासणी करून घेणे योग्य आहे. चाळिशीनंतर प्रत्येक स्त्रीने दरवर्षी एकदा ही तपासणी करून घ्यायला हरकत नाही. फक्त TSH ची तपासणी केली तरी पुरते आणि ही अजिबात महागाची टेस्ट नाही.

     शिवाय जन्मतः प्रत्येक बाळाची थायरॉईडची टेस्ट केली जाते.ती अत्यंत महत्त्वाची असते. जन्मतः थायरॉईडची समस्या असल्याचे निदान वेळेवर झाले नाही तर बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर अतिशय गंभीर परिणाम दिसून येतात.

थायरॉईडची समस्या असेल तर काय काळजी घ्यावी?

     थायरॉईडसाठी डॉक्टर सहसा एक गोळी देतात. या गोळ्या सुरू केल्यावर डोस अॅडजस्ट होईपर्यंत दर सहा आठवड्याला आणि एकदा डोस सेट झाला की निदान दर तीन महिन्याला TSH ची तपासणी करायला हवी.

     बऱ्याच वेळा पेशंट वर्षानुवर्षे तपासणी न करता एकच डोस घेत रहातात. हे चुकीचे आहे. तसंच थायरॉईडची गोळी सकाळी उपाशीपोटी घेऊन अर्धा तास तरी दुसरे काहीही घेऊ नये. चहा सुद्धा अर्ध्या तासाने घ्यावा. गोळीचा योग्य परिणाम होण्यासाठी हे गरजेचे आहे. स्वतःच मनाने डोस वाढवणे आणि कमी करणे हे प्रकार टाळावेत.

     कोणतेही वेगळे उपचार घेताना थायरॉईडची गोळी बंद करणे धोकादायक ठरू शकते. आम्ही रोजच अशा केसेस बघतो.

    थायरॉईडच्या गोळ्यांची बाटली थंड आणि कोरड्या जागी ठेवावी. खिडकीत, उन्हात, ओल लागेल अशा ठिकाणी ठेवू नये.

     थायरॉईडमुळे केस खूप प्रमाणात गळू शकतात. वजन वाढणे, त्वचा कोरडी होणे हे परिणामही दिसतात. बऱ्याच वेळा वजन वाढलेल्या पेशंट थायरॉईड आहे म्हणून वजन जास्त आहे अशी स्वतःची आणि इतरांची समजूत करून घेतात. वेळेवर व्यवस्थित गोळ्या घेतल्या, आहार आणि व्यायाम चालू ठेवला तर वजन आटोक्यात रहायला काहीच प्रॉब्लेम नसतो.

    वेळेत थायरॉईडचं निदान झालं तर केसांची आणि त्वचेची समस्या गंभीर रूप धारण करण्याआधीच उपचार सुरू करता येतात. त्यामुळे थायरॉईडची टेस्ट करण्याबद्दल डॉक्टरांनी सुचवलं तर लगेच करून घेतलेली उत्तम!

    थायरॉईडची समस्या असलेल्या पेशंट्समध्ये कॅलशियमची कमतरता आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच थायरॉईड नियंत्रणात नसेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवं.

     आयोडीनच्या कमतरतेमुळेही थायरॉईडची समस्या उद्भवू शकते. आपल्याकडे मिठामध्ये आयोडीन असणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा धोका कमी होतो. काही जण आयोडीनयुक्त मीठ न खाता वेगळे मीठ खातात, त्यांनी हा धोका लक्षात घ्यायला हवा.

      थायरॉईडची समस्या ही कोणत्याही प्रकारच्या व्यायामाने कमी होत नाही हे वैद्यकीय सत्य आहे. वजन कमी झाल्यास थायरॉईडचा डोस कमी होऊ शकतो. व्यायाम जरूर करा, पण वेडेवाकडे मानेचे व्यायाम केल्याने थायरॉईडची समस्या दूर होणार तर नाहीच पण मानेचे दुखणे सुरू होऊ शकेल.

     या सगळ्या बाबींचा विचार करून जर आपल्या जीवनशैलीत बदल केले, तर थायरॉईडचा बागुलबुवा समोर उभा राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *