Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

 प्रस्तावना –   हिंदु धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या आपत्काळात गुढीपाडवा कसा साजरा करायचा हेही समजून घेऊया.

गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !

गुढीपाडव्याची तिथी : युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा

वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ? : याचा प्रथम उद्‍गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभ दिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे.  आज   सर्वजण साजरा करत असलेल्या १ जानेवारीला वर्षारंभ का, याला शास्त्रीय आधार नाही. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.

गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्व – वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (10:35) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्त्व – रामाने वालीचा वध केल्याचा दिवस : रामाने वालीचा वध या दिवशी केला.ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.

शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस ! : शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.गुढीपाडवा हा वर्षारंभ म्हणून साजरा करण्यामागील हि ऐतिहासिक कारणे आहेत.

गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व –

सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.1 जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन

गुढीपाडवा हा पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : ‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. याउलट 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडवा या दिवशी सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल, तर 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणार्‍या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार 1 जानेवारी हा नव्हे, तर गुढीपाडवा हाच नववर्षारंभ साजरा करण्यात आपले खरे हित आहे.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त : गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

प्रत्येक पाऊल समृद्धीकरता पुढे टाकण्याची शिकवण देणारी चैत्र शुक्ल प्रतिपदा !  : उत्तरायणातील वसंतऋतूतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शुभसंकल्पाची गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हे संकल्पशक्‍तीचे गुढत्व दर्शवते. ‘आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धीकरिता आता पुढेच पडत राहील’, असे प्रतिप्रदा सांगते; म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास, तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्यसंकल्परूपी गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. असे परात्पर गुरु परशुराम माधव पांडे महाराज म्हणतात.

गुढीपाडवा असा साजरा करा !

पारंपरिक पद्धतीने गुढी उभी करावी,त्यासाठी खाली दिलेले साहित्य वापरून गुढी उभारता येईल.

1.नवीन बांबू उपलब्ध उपलब्ध करून तो स्वच्छ करून वापरावा. तेही शक्य नसल्यास अन्य कोणतीही काठी गोमूत्राने वा विभूतीच्या पाण्याने शुद्धी करून वापरू शकतो.

2. कडुनिंब वा आंब्याच्या पानांचा वापर करूयात .

3. नारळ, विड्याची पाने, सुपारी,फळे,फुले यांचा वापर करून पूजा करावी काही प्रसंगी हे साहित्य उपलब्ध होत नसल्यास अक्षता या सर्वसमावेशक असल्याने पूजेतील उपचाराच्या वेळी अक्षता वाहू शकतो.

4. गुढीपाडव्याच्या दिवशी जिरे, हिंग, मध, कडुनिंबाची कोवळी पाने-फुले आणि चण्याची भिजवलेली डाळ यांचा मिळून प्रसाद सिद्ध केला जातो. या प्रसादासाठी वापरण्यात येणार्‍या वरील वस्तूंमध्ये त्या दिवशी जिवांना आवश्यक तत्त्वे ईश्‍वराकडून आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते म्हणून या प्रमाणे प्रसाद करून तो ग्रहण करावा .

5.संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी उभारलेली गुढी उतरवावी.

पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ – ‘वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणार्‍या बर्‍या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो; म्हणून पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकायचे असते.असे केल्याने भविष्यातील घडणाऱ्या घडामोडींवर मत करणे आणि त्याचे नियोजन करणे सोपे जाते.उदाहरण म्हणून पहिले तर जर दुष्काळ पडणार असे पंचागात सांगितले असेल, तर धान्य आणि वैरण यांची काटकसर करून किंवा ज्या देशांत सुबत्ता होणार वा झालेली असेल, तेथून धान्य, वैरण आणून साठा करता येतो अन् येणार्‍या अडचणीच्या काळाची व्यवस्था करून ठेवता येते.

गुढीपाडव्याला पुढील प्रमाणे शुभेच्छा देता येतील !

सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्‍चित् दुःखमाप्नुयात् ॥

अर्थ : पृथ्वीवरील सर्व जीव सुखी आणि निरामय (रोगमुक्त) होवोत. सर्वांचे कल्याण होवो. सर्वांची एकमेकांकडे पहाण्याची दृष्टी शुभ आणि कल्याणमय असो आणि कोणाच्याही वाटेला दुःख न येवो.

तेव्हा वर वर्णन केल्याप्रमाणे या गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्पाची, तो प्रत्यक्षात यावी; म्हणून कृतीशील भक्तीसाठी मूर्त स्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेढ आनंदाने करून म्हणूया,

‘ॐ शांति: शांति: शांति: ।’

संकलक : हिरालाल तिवारी

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *