Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

मुमताज ©मुकुंद कुलकर्णी

आज जे साठीच्या आसपास आहेत त्यांच्या दिलाची धडकन मुमताज आज 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे . मुमताज उर्फ मुम्मु ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आरोग्यपूर्ण शतकपूर्तीसाठी शुभकामना ! इ.स. 1950 ते इ.स. 1970 हा आमच्या दृष्टीने हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ . या गोल्डन एरा मध्ये मुमताजने आपल्या अदाकारीने रसिकांवर अधिराज्य गाजवले . आजच्या पिढीला मुमताज बद्दल फारशी माहिती असण्याची शक्यता कमी , कारण बऱ्याच वर्षांपूर्वी तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आहे .

मुमताजचा काळ सुरू होण्यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिका ही अबोल , सोशिक , शांत , सहनशील या चौकटीतच असे . तिला थोडीशी नटखट , चुलबुली केली मुमताजने त्यानंतर हा वारसा चालवला तनुजाने त्यानंतर तिची मुलगी काजोलने . इ.स. 1960 आणि इ.स. 1970 च्या दशकातील बहुतेक सर्व टॉपच्या नायकांबरोबर मुमताजने एकाहून एक सुंदर चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला दिले . दिलीपकुमार , देव आनंद , शम्मी कपूर , राजेश खन्ना , जितेंद्र , धर्मेंद्र ,संजीवकुमार , राजेंद्रकुमार , शशी कपूर , फिरोज खान या सर्वांसोबत तिची जोडी छान जमली , त्याआधी दारासिंग बरोबर तिने अनेक हिट स्टंटपट दिले . पण , राजेश खन्ना बरोबर तिची जोडी प्रेक्षकांना जास्त भावली . दो रास्ते पासून याची सुरुवात झाली . त्यानंतर बंधन , अपना देश , सच्चा झूठा , दुश्मन , आपकी कसम , रोटी , आईना , प्रेमकहानी असे एकापेक्षा एक सरस चित्रपट या जोडीने दिले .

दि.31 जुलै 1947 रोजी मुंबई येथे मुमताजचा जन्म झाला . अब्दुल सलीम अस्करी आणि शदी हबीब आगा यांची ती मुलगी . मुमताजच्या फिल्मी कारकीर्दीची सुरुवात इ.स. 1958 पासून झाली . सोने की चिडिया या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला . सुरूवातीला स्ट्रगल पिरियड मध्ये तिला तिच्या बेढब नाकावरून काम मिळत नसे .याच अपऱ्या नाकाच्या मुमताजला पुढे लोकांनी डोक्यावर घेतलं . आपल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत मुमताजने 108 चित्रपटात काम केले . ओ.पी.रल्हन यांच्या गेहरा दाग चित्रपटात तिला पहिला दखल घेण्याजोगा रोल मिळाला . त्यानंतर मुझे जीने दो सारख्या काही यशस्वी चित्रपटात तिला छोटे मोठे रोल मिळत गेले .नायिका म्हणून तिची जोडी पहिल्यांदा जमली दारासिंग बरोबर . सोळा चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले . या चित्रपटांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली पण , त्यामुळे स्टंट फिल्म हिरॉईन अशी तिची ख्याती झाली . त्या काळात दारासिंगला एका चित्रपटाचे साडेचार लाख रुपये मिळत , तर मुमताजला अडीच लाख .

इ.स. 1969 च्या राज खोसला यांच्या सुपरडुपर ब्लॉकबस्टर दो रास्ते या चित्रपटापासून मुमताजला मुख्य प्रवाहातील नायिकेची प्रतिमा लाभली . स्टंटपटात दारासिंगची नायिका म्हणून गाजलेल्या मुमताजने आपल्या सौंदर्य , अभिनय आणि नृत्य या गुणांवर मुख्य प्रवाहात एक गुणी नायिका म्हणून आपला जम बसवला . प्रेमप्रसंग असो किंवा तणावपूर्ण भावनिक दृश्य असो अथवा एखादा विनोदी पंच असो सर्व सिच्युएशन्समध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने मुमताज तो प्रसंग जिवंत करत असे . सच्चा झूठा चित्रपटासाठी आधी तिला शशी कपूरने स्टंटपटातील नायिका म्हणून नाकारले होते नंतर राजेश खन्ना बरोबर हा चित्रपट तुफान गाजला . याच शशी कपूरने चोर मचाये शोर चित्रपटात मुमताजसाठी हट्ट धरला होता . लोफर आणि झील के उस पार हे धर्मेंद्र बरोबरचे तिचे चित्रपटही रसिकांना आवडले . इ.स. 1970 च्या संजीवकुमार सोबतच्या खिलौना या चित्रपटासाठी मुमताजला फिल्मफेअर बेस्ट ॲक्ट्रेस पुरस्कार मिळाला होता .त्या पुरस्काराबद्दल आपला आनंद व्यक्त करताना मुमताज म्हणते , ” Very happy that the audience accepted me in an emotional role . ” इ.स.1996 साली फिल्मफेअर ने मुमताजला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले . बहुतेक सर्व नायकांबरोबर तिची जोडी जमली पण , राजेश खन्ना सोबत तिची जोडी सर्वात जास्त यशस्वी ठरली . इ.स. 1977 आईना या चित्रपटानंतर तिने चित्रपट संन्यास घेतला . लग्नानंतर कुटुंबाला पूर्णवेळ देण्यासाठी मुमताजने चित्रपटसृष्टीला अलविदा केले . त्यानंतर इ.स. 1990 साली तिने आँधिया चित्रपटातून पुनरागमनाचा प्रयत्न केला , पण तो पूर्णपणे फसला . इ.स. 1974 साली तिने मयूर माधवानी या बिझिनेसमन बरोबर विवाह केला आणि ती कायमसाठी इंग्लंडला निघून गेली . तिला नताशा आणि तान्या या दोन मुली आहेत .

राजेश खन्ना बरोबर मुमताजची जोडी जेंव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होती तेंव्हा त्यांच्या अफेअर च्या बातम्यांनी फिल्मी मॅगेझिन्सचे रकानेच्या रकाने भरून जात . काका आणि मुमताज यांच्यावर पावसात चित्रित झालेली गाणी आजही लोकप्रिय आहेत . या दोघांची केमिस्ट्री पाहून लोकांना त्यांचे अफेअर असल्याचा संशय येत असे . पण काका बरोबर आपले अफेअर असल्याचा मुमताजने नेहमीच इन्कार केला . ते दोघेही शेजारी होते . मुमताजने विवाहाचा निर्णय घेतल्यावर राजेश खन्नाला धक्का बसला होता . खरं तर तेंव्हा तो स्वतः विवाहित होता . योगायोग असा की , मुमताजचा सिनेसृष्टीतून एक्झिट झाला आणि तेंव्हापासूनच राजेश खन्नाचा पडता काळ सुरू झाला .

मुमताज अठरा वर्षांची होती तेंव्हा शम्मी कपूरने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते . मुमताजचेही शम्मी कपूर वर प्रेम होते . पण , लग्नानंतर मुमताजने चित्रपट संन्यास घ्यावा ही शम्मी कपूरची अट होती . त्याला मुमताजचा नकार होता . मयूर माधवानी याच्याशी झालेल्या लग्नामुळे मुमताज खूष होती . अचानक घेतलेल्या लग्नाच्या निर्णयामुळे मुमताजने सगळ्यांनाच चक्रावून टाकले होते . पण , माझ्यावर प्रेम करणारा जोडीदार मिळाला आणि मी लग्नाचा निर्णय घेतला या आपल्या मतावर ती ठाम होती .

मुमताजला वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी ब्रेस्ट कॕन्सर डिटेक्ट झाला होता . ते समजल्यावर आधी ती खूप घाबरली पण तिने कॕन्सरशी खंबीरपणे लढा देऊन त्यावर मात केली . त्या काळात तिच्या कुटुंबियांनी तिला भक्कम आधार दिला . सोशल मिडियावर मध्यंतरी मुमताजच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या . तिची मुलगी तान्या हिने सोशल मीडियावरून त्याचे खंडन केले आणि इन्स्टाग्रामवर तिचे अगदी अलीकडले फोटो शेअर केले .

बॉलिवूड अतिशय निर्दयी आहे . इथे उगवत्या सूर्यालाच सलाम केला जातो . मोठ्या मोठ्या स्टार्सचा लोकांना विसर पडतो , याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुमताज एकेकाळी तिच्यावर जीव ओवाळून टाकणारे तिचे चाहते तिला विसरले

अशा या गुणी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आरोग्यपूर्ण शतकपूर्तीसाठी तिचे अभिष्टचिंतन ! उर्वरित आयुष्य सुखा समाधानात जावो ही सदिच्छा !

मुमताज ©मुकुंद कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *