आता..आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक ;विद्यापीठास तीन लाखांची देणगी

0
73

सोलापूर, दि.24- येथील ज्येष्ठ वास्तुविशारद व्ही. टी.कोटा यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास आर्किटेक्चरच्या सुवर्णपदकासाठी तीन लाख पंधरा हजार रुपयांची देणगी बुधवारी देण्यात आली आहे.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेऊन व्ही. टी. कोटा यांचे पुत्र अतुल कोटा आणि नातू अमेय कोटा यांनी तीन लाख पंधरा हजार रुपयांचा धनादेश विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे. आता दरवर्षी होणाऱ्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात संलग्न महाविद्यालयातून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रोजेक्ट आर्किटेक्चर डिझाईन थेसिस या विषयात अंतिम सत्रांमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस सुवर्णपदक देण्यात येणार आहे. कै. तुकाराम लक्ष्मण कोटा व कै. चंद्रमा तुकाराम कोटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे सुवर्णपदक दिले जाणार आहे.

ज्येष्ठ वास्तुविशारद व्ही. टी. कोटा हे बडोद्याच्या कलाभवन एम. एस. विश्वविद्यालयातून वास्तुकलेची पदवी मिळवलेली आहे. पद्मशाली विणकर समाजातील ते पहिले वास्तुविशारद असून सोलापुरात वास्तुविशारद व्यवसायाचे पहिले दालन त्यांनी सुरू केले आहे. त्यांनी विद्यापीठास दिलेल्या देणगीमुळे सुवर्णपदकामध्ये भर पडली आहे. यामुळे त्यांचे विद्यापीठाकडून आभार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.