धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

0
36

Solapur – आज शनिवारी पहाटे एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की…

आनंद मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून सेवेत होते. त्यांनी आज पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले असल्याची माहिती मिळाली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर आनंद मळाळे नांदेड येथे कार्यरत होते. गेल्या महिन्याभरापासून आनंद मळाळे हे आजारी रजेवर सोलापूरला घराकडे आले होते. आज पहाटे चारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मिळाळे यांनी घराच्या अंगणामध्ये स्वतःकडील रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले.

ते बिलोली येथे पोलिस दलात एपीआय पदावर कार्यरत होते. त्यांच्या साधारण दीड एक महिन्यापूर्वी ड्यूटीवर असताना अपघात झाला होता. डोक्याला जबर मार लागला होता. नांदेड येथे ते उपचारासाठी ॲडमिट होते.

कामाचा ताण असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

आनंद मळाळे हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली आहे. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.

घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हा सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथे आणलेला आहे. या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांची गर्दी झालेली आहे.