आदेश | पंढरपूर शहरासह आजूबाजूला मद्य विक्रीस बंदी

0
33

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर शहर आणि परिसरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अन्वये 9 जुलै ते 11 जुलै 2022 पर्यंत शहरासह आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व देशी, विदेशी मद्य, बिअर व ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

            12 जुलै आणि 13 जुलै 2022 रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून पाच कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्य बिअर विक्री व ताडी विक्री दुकाने सायंकाळी पाच वाजेपासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

            आषाढी एकादशीनिमित्त संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी (गावात/शहरात ) सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक आहे. पालखी मार्गावरील गावात 4 जुलैला नातेपुते पूर्ण दिवस मद्य विक्री व ताडी दुकाने बंद बंद राहतील, 5 जुलैला माळशिरस, अकलूज याठिकाणी बंद, 6 जुलैला वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर या गावात बंद, 7 जुलैला भंडीशेगाव, पिराची कुरोली येथे बंद तर 8 जुलैला वाखरी येथे मद्य विक्री बंद राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे.