Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

 कोरोना संसर्ग कमी झाल्याने आणि निर्बंध हटविल्याने यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. ही वारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. 

आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, यंदाची आषाढी वारी 10 जुलै 2022 रोजी भरणार असून आषाढी यात्रा कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातून, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी सुमारे दहा ते बारा लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून आवश्यक मूलभूत सोयी सुविधा, सुरक्षा दिली जावी. राष्ट्रीय महामार्ग कामांमुळे पालखी तळ, पालखी विसावा जागा अपुऱ्या पडत असतील तर जागेची तत्काळ पर्यायी व्यवस्था करून वारकरी भाविकांना जागेबाबत अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यात्रा कालावधीत वारकरी व भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित विभागाला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. जिल्हा परिषद विभागाने पालखी मार्गावर व पालखीतळावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व तात्पुरते शौचालय, पालखी मार्ग व पालखी तळावरील अतिक्रमणे काढणे. पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था याबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी, काटेरी झाडेझुडपे काढावीत. पालखी तळावर पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आषाढी वारी पावसाळ्यात येत असल्याने साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता मुबलक प्रमाणात औषधाचा साठा तयार ठेवावा, तज्ञ डॉक्टरांसह फिरते आरोग्य पथक उपलब्ध ठेवावे, पालखी मार्ग व पालखी तळावरील पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. पंढरपूर नगरपालिकेने शहरात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी व भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तात्पुरते शौचालय व्यवस्थेच्या स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षेचेबरोबरच वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन नियोजन करावे. महावितरण विभागाने पालखी मार्ग व पालखी तळाच्या ठिकाणी अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा करावा. आवश्यक ठिकाणी देखभाल व दुरुस्तीची कामे करावीत, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या. आरोग्य विभागाने वैद्यकीय सुविधा, ॲम्ब्युलन्स आणि शववाहिका याबाबत दक्षता घ्यावी.

बैठकीमध्ये वारीमध्ये वॉकीटॉकीचा वापर करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या. वॉकीटॉकी आणि बॅरिकेट्स यासाठी पोलीस विभागाने प्रस्ताव सादर करावा. नाविन्यपूर्ण योजनेतून त्याला मान्यता मिळविण्यात येईल, असेही श्री शंभरकर यांनी सांगितले.

यंदा जादा भाविक येण्याची शक्यता गृहित धरून जादा एस.टीची मागणी करावी, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.

वारीच्या पूर्वनियोजनाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली. इंन्सीडंट कमांडर म्हणून अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

श्री. गुरव यांनी मंदिर समिती, तालुका प्रशासनाकडून आषाढी वारी कालावधीत करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *