सोलापूरच्या कलाकारांची निर्मिती ही नाविन्यपूर्ण व प्रयोगशील : महेश मांजरेकर

0
98

मुंबईत सोलापूर आर्टिस्ट संस्थेच्या कला प्रदर्शनाचे उदघाटन

सोलापूरच्या कलाकारांसाठी मुंबईत कायमचे व्यासपीठ निर्माण व्हावे : . सुभाष देशमुख

 

मुंबई,दि.3 : आर्टिस्ट 18” या सोलापुरातील कलाकारांच्या चित्र व शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या शुभहस्ते, उत्तम पाचारणे, चेअरमन ललित कला अकॅडमी, नवी दिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. . सुभाषबापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांसह संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, सचिव प्रा.डॉ. नरेंद्र काटीकर, संस्थेचे हितचिंतक अमर जाधव यावेळी उपस्थित होते.

सोलापूरच्या कलाकारांची निर्मिती ही अत्यंत नाविन्यपूर्ण व प्रयोगशील आहे असे नमूद करत असतानाच विविध नाटकांच्या दौर्‍याच्या सोलापुरातल्या आठवणी देखील मांजरेकर यांनी व्यक्त केल्या. सोलापुरात विविध कला प्रकारांमधील अनेक मान्यवरांच्याबद्दल माहिती सांगत असतानाच त्यांनी प्रदर्शनामधील चित्र व शिल्प यासंदर्भात बोलताना म्हणाले यामध्ये ग्रामीण संस्कृती, गाईचे शेण, कवडी याचा चित्रांमध्ये छान मिलाफ साधत कलानिर्मिती झाली आहे. सोलापूर म्हणून एकत्रितरित्या आयोजित प्रयोग तथा प्रदर्शनाचे आयोजन हे आगळे वेगळे असल्याचे व प्रथमतः आज अशा चित्र-शिल्प कलाकृती पाहण्याचा योग आला असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी या प्रदर्शनामधील काही कलाकृती घेण्याचा मानसही व्यक्त केला.

प्रमुख अतिथी उत्तम पाचरणे यानी मनोगतामध्ये सोलापूरच्या सोलापूरच्या 18 कलाकारांचे ललित कला अकादमीच्या वतीने कौतुक करताना असा प्रयोग सर्वप्रथमच पाहत असल्याचे नमूद केले. अशा वैविध्यपूर्ण कलाकृती सादर करण्यासाठी, समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे व ते माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांनी उपलब्ध करून दिले आहे. याबरोबरच त्यांचा हा आदर्श इतरांनी घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. 

मा. आमदार सुभाष बापू देशमुख अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले की, सोलापूरचे मार्केटिंग करत असताना या सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या प्रदर्शनातील कलाकृतीद्वारे सोलापूर हे उत्तमरित्या पोहोचत आहे. मुंबईतील मुळतः सोलापूरकर असलेल्यांनी सोलापूर ब्रँडिंग साठी कटिबद्ध व्हावे. अशा सोलापूरच्या कलाकारांसाठी एक कायम व्यासपीठ निर्माण करावे असेही आवाहन त्यांनी केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.डॉ.नरेंद्र काटीकर यांनी करताना संस्थेचा परिचय व उद्देश, मान्यवरांचे स्वागत करून 18 कलाकारांची ओळख करून दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पद्मा देशपांडे यांनी तर आभार चित्रकार प्रकाश पोरे यांनी केले.

या उद्घाटन प्रसंगी मुंबईकर, मुंबईस्थित सोलापूरकर, बांधकाम व्यावसायिक योगेश कंडरे, मंत्रालयातील अधिकारी संतोष ममदापुरे, सोलापूर सोशल फाउंडेशनचे समन्वयक विजय पाटील, फाऊंडेशनचे सल्लागार, हितचिंतक, कलाकार-चित्रकार, शिल्पकार कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये सोलापुरातील 18 कलाकार-चित्रकार, शिल्पकार आपली कला सादर करणार आहेत. हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दिनांक 3 मे ते 9 मे 2022 या कालावधीमध्ये सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत रसिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. तरी या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले.